पुणे : आगामी 24 तास राज्यात वादळी वार्यासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्यात कडक ऊन अन् ढगांच्या गर्दीने उष्ण अन् दमट वातावरण तयार झाले होते. त्यामुळे वेदर डिस्कम्फर्ट (अस्वस्थ वातावरण) वाढल्याने शुक्रवारी नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झालेले दिसत होते. पाकिस्तानात तयार झालेला कमी पश्चिमी चक्रवात राजस्थानपर्यंत आला आहे. तसेच कर्नाटक ते विदर्भ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस काही भागात हलक्या सरी पडल्या मात्र पावसाचा जोर कुठेही जास्त नव्हता.
ढगाळ वातावरण अन् वरून तापलेले ऊन अशी स्थिती तयार झाल्याने वेदर डिस्कम्फर्ट (अस्वस्थ करणारे वातावरण) तयार झाले होते. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या तेरा जिल्ह्यांना आज यलो अलर्ट दिला आहे.
शुक्रवारचे कमाल तामपान
अकोला 42.6, पुणे 38.6, अहमदनगर 39, कोल्हापूर 38.2, महाबळेश्वर 31.9, मालेगाव 41.2, नाशिक 39.2, सांगली 38.6, सातारा 38.5, सोलापूर 41, परभणी 41.6, नांदेड 40.8, बीड 40.4, नागपूर 40.2, वर्धा 41.5.