देशभरात लोकसभा निवडणुकांचा माहोल आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत पाच टप्प्यांत या निवडणुका पार पडणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, यादरम्यान सध्या लग्नसराई देखील सुरु असल्याने अनेकांना लग्नाच्या तारखा ठरवताना पेच निर्माण झाला आहे. कारण यातील काही तारखांना लग्नाचा मुहुर्त आहे. तर काही तारखांना लग्नाचा मुहुर्त नसला तरी निवडणुकांच्या तयारीसाठी लागणार असल्याने त्या तारखांचीही अडचण आहे.
मात्र, असे असले तरी आधी लगीन निवडणुकांचे मग आमचे अशी भूमिकाही काही वधू-वर घेताना दिसत आहेत. त्यासाठी लग्न तारखांमध्ये बदल करण्याची तयारी ते दाखवत आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी निवडणुका आहेत, तेथे या तारखा नाकारुन वधु-वराच्या नातेवाईकांकडून दुसऱ्या तारखा काढण्यासाठी आग्रह सुरु आहे. वर-वधू पक्षाकडून आणि संबंधितांकडून तसा आग्रह सध्या सुरु असल्याचे दिसते आहे.
हिंदु पंचांगानुसार वरील काही तारखा लग्नसाठी व इतर काही कार्यक्रमांच्या दृष्टीने शुभ असल्याने त्यानुसार नियोजन केले जात होते. मात्र अचानक निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र या नियोजनात बदल करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे तारखा ठरविण्यात विलंब देखील होऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, मोजक्याच तारखा असतील आणि त्यातही निवडणुकांमुळे काही तारखा कमी झाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
लग्न म्हटलं, हळद, मेहंदी, दिवट्या असे अनेकानेक कार्यक्रम असतात या दिवसांमध्येही बदल केले जावे अशी मागणी नातेवाईक करु लागले आहेत. बऱ्याचदा वधू-वरास जरी या तारखांना काही अडचण नसली तरी त्यांच्या नातेवाईकांना या तारखांची अडचण असते. कारण अनेकांचे नातेवाईक शासकीय सेवेत असतात, तर काहीजण राजकारण असल्याने प्रचारात व्यस्त असतात त्यांनाही या तारखांना लग्नाला हजेरी लावणे शक्य होत नाही. या सगळ्याचा विचार करुन वधू-वर सामंजस्याची भूमिका घेताना पाहावयास मिळत आहेत.
शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या लोकांना निवडणुकीचे काम सक्तीचे व महत्त्वाचे असल्याने त्यांना रजा मिळणे वा नाकारणे अशक्य असते. त्यामुळे लग्नाला जाता येणार नाही अशी अडचण आहे. शिवाय, प्रचारात असल्याने अनेक जण लग्नांना येणारही नाहीत. तत्सम कार्यक्रम ठेवले तरी ही अडचण येणारच आहे. म्हणून या तारखा न ठेवता इतर तारखांना लग्नांचा आग्रह धरला जात आहे. शिवाय, प्रत्येक गावातील नेते-कार्यकर्ते या निवडणुकीत सक्रिय होत असल्याने त्यांची गैरहजेरी असण्याची शक्यता जास्त आहे.
ऐन लग्नसराईत निवडणुकांचा प्रचार
लग्नसराई म्हटलं की, जनसंपर्काच्या दुष्टीने राजकीय नेते मंडळी या कार्यक्रमांना भेटी देण्यास पसंती देत असतात. त्यांच्या जनसंपर्काचा तो हुकमी एक्का असतो. नागरिकांच्या सुखदु:खाच्या प्रसंगी हजेरी लावण्यास नेतेमंडळी पसंती देत असतात. यंदा मात्र, नेते मंडळीची चांगलीच फरफट होताना पाहायला मिळणार आहे. कारण एकीकडे निवडणुकांचा प्रचार व तयारी असेल तर दुसरीकडे लग्नसंभारचे आलेले आमंत्रण. त्यामुळे राजकीय मंडळींची चांगलीच दमछाक होणार आहे.