नागपूर: विदर्भातील अनेक ठिकाणी सध्या उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. तापमान 38 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने उन्हाचा तडाखा जाणवत असताना हवामान बदलले आहे. शनिवार, रविवारी असे दोन दिवस नागपुरात जोरदार वादळी, गारपीट व पावसाने हजेरी लावली. झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला तर मोठ्या प्रमाणात शेतमालाची नासाडी झाली. अनेक लग्न, स्वागत समारंभात तारांबळ उडाली. आज सोमवारी सकाळपासून सुर्यप्रकाशीत हवामान असले तरी आकाशात ढगांची गर्दी सायंकाळी होण्याची शक्यता आहे. 17 आणि 19 मार्च रोजी हवामान विभागाने नागपूर विभागात यलो अलर्ट दिला आहे. दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, उमरखेड, दारव्हा, पुसद तालुक्यातही अवकाळी पावसाने पपई पिकासह गहू पिकाचे मोठे नुकसान झाल्याची समोर आले आहे.