नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीरसिंह संधू आणि ज्ञानेश कुमार यांनी शुक्रवारी (दि.१५) महत्वाची बैठक घेतली. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि राज्य विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग शनिवारी (दि.१६) दुपारी ३ वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. कालच दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंह संधू यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणूक नेमकी कधी जाहीर होणार याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. ती तारीख अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी देशभरात लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक कसे असेल, किती टप्प्यात लोकसभा निवडणूक होईल. त्यासोबत काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत ९७ कोटी मतदार, २ कोटी नवे मतदार
आगामी लोकसभा निवडणुकीत ९७ कोटी लोक मतदार असणार आहेत. शकतील. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार १८ ते २९ वयोगटातील २ कोटी नवीन मतदार असणार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत जवळपास ६ टक्के वाढ झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक नोंदणीकृत मतदार आहेत. ज्याची संख्या जवळपास ९७ कोटी आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान ७ टप्प्यांत पार पडल्या. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे २३ मे २०१९ ला निकाल लागला होता. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम ५ मार्चला जाहीर झाल्या होत्या. त्यावेळी ७ एप्रिल ते १२ मे दरम्यान ९ टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळीही मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर चौथ्या दिवशी १६ मे रोजी निकाल लागला होता.