अकोला : अकोला शहरातील अकोटफैल परिसरातील नायगाव येथील एका अडीच वर्षीय मुलाचा दोन वेळा अपहरण करण्याचा प्रयत्न याच परिसरातील एका संशयिताने केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अकोटफैल पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनाविण्यात आली.
नायगाव परिसरातील मीलननगर येथील रहिवासी मोहम्मद मीर आलम मोहम्मद मोइन (वय ३४) यांनी अकोटफैल पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा घरासमोर खेळत होता. यावेळी संशयित यार मोहम्मद लाल मोहम्मद आणि त्यांचा मुलगा या दोघांनी मोहम्मद मीर आलम मो. माइन यांच्या अडीच वर्षीय मुलाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
मोहम्मद मीर आलमने दिलेल्या तक्रारीनुसार यापूर्वी २० फेब्रुवारीरोजीही त्यांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळीही हा प्रयत्न अयशस्वी झाला होता. नंतर पुन्हा २४ फेब्रुवारीरोजी तसाच प्रयत्न झाल्याचे पोलीस तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला असता, संशयित यार मोहम्मद लाल मोहम्मद याने फिर्यादीस शिवीगाळ करीत मारहाण केली.
याप्रकरणी अकोटफल पोलिसांनी संशयित यार मोहम्मद लाल मोहम्मद याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.