अकोला,दि. 6: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे चांभार, ढोर, होलार व मोची प्रवर्गातील युवक-युवतींसाठी दि. 16 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान गारमेंट मेकिंगचे विनामूल्य प्रशिक्षण होणार आहे. युवकांना प्रशिक्षणातून स्वत:चा व्यवसाय, उद्योग उभारण्यास प्रोत्साहित करण्याचा उपक्रमाचा उद्देश आहे. एक महिन्याच्या या प्रशिक्षणात गारमेंट मेकिंग, फ्रॉक, ब्लाऊज, पेटीकोट, चुडीदारचे विविध प्रकार प्रात्यक्षिकातून शिकण्याची संधी दिली जाईल. त्याचप्रमाणे, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, संधींचा शोध, निवड, उद्योग उभारणी, व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी, उद्योग कायदे, नोंदणी, विविध योजना, कर्जपद्धती आदींबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल.
प्रशिक्षणात 18 ते 45 वयोगटातील दहावी उत्तीर्ण असलेल्या व्यक्तींना सहभागी होता येईल. इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीतून निवड दि. 13 फेब्रुवारीला दु. 12 ते 2 वा. दरम्यान कृषकभवन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे केली जाईल. तथापि,त्यासाठी दि. 12 फेब्रुवारीपूर्वी अर्ज व नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक वृषाली काळणे यांच्याशी 9373996027 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राशी संपर्क साधावा.