मुंबई : राज्यातील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासन आणि शासन गेल्या वर्षीपासून तोंडी आश्वासने देत आहेत, डॉक्टरांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने राज्यातील सर्व निवासी डॉक्टर बुधवारी (दि. ७) संध्याकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सेंट्रल मार्डने गेल्या वर्षी ३ जानेवारीला संप मागे घेतला होता. परंतु, आज त्या आश्वासनाला ३९३ दिवस उलटून गेले आहेत, तरीही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. सेंट्रल मार्डने आजपर्यंत २८ पत्रे लिहून प्रशासकीय आणि मंत्री स्तरावर पाठपुरावा केला आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ४ ऑक्टोबररोजी झालेल्या भेटीत, डॉक्टरांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर सोडवण्याचे तोंडी आश्वासन देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. एक जबाबदार नागरिक आणि डॉक्टर या नात्याने, संपादरम्यान रुग्णसेवेला अडथळा निर्माण झाल्याबद्दल आम्ही अत्यंत दिलगीर आहोत आणि सर्व आपत्कालीन सेवा कायम राहतील. तसेच संपा दरम्यान कोणत्याही बाधित रुग्णांच्या काळजीची जबाबदारी पूर्णपणे सरकारवर असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी सांगितले.
निवासी डॉक्टरांच्या मागण्या : –
वसतिगृह निवास :
कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा वसतिगृह निवासाची उपलब्धता.
स्टायपेंडचे नियमितीकरण :
आजपर्यंतचे थकीत स्टायपेंड मंजूर करून दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत निवासी डॉक्टरांच्या बँक खात्यांमध्ये स्टायपेंडचा भरणा.
स्टायपेंड वाढ:
केंद्रीय संस्थांप्रमाणेच स्टायपेंडचे पेमेंट देण्यात यावे.