२०४७ पर्यंत देश विकसित भारत बनण्यासाठी काम सुरु आहे, विकसित भारतासाठी देशाची दिशा काय असेल हे देशातील तरुणाई ठरवेल. पुढच्या २५ वर्षांत तरुणाईला स्वतःचे आणि देशाचे भविष्य ठरवायचे आहे. स्थानिक, जिल्हा, राज्य आणि केंद्र पातळीवर होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये तुमची जबाबदारी मोठी असेल. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथम मतदान करणाऱ्या मतदारांना उद्देशुन केले. गुरुवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नमो नवमतदाता संमेलनात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. अंतराळ, संरक्षण, उत्पादन, तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये आपण पुढील काही वर्षांत कुठे पोहोचू, हे सर्व तरुणांवर अवलंबून असेल. तुमच्याकडे प्रेरणा आणि नाविन्य आहे. आणि माझे प्राधान्य देशातील तरुणाई आहे, त्यामुळे तुमची स्वप्न हे माझे संकल्प आहेत, असेही पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जेव्हा स्थिर सरकार असते तेव्हा देशासाठी मोठे निर्णय घेणे सोपे होते. तरुणांचे एक मत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. तुमच्या एका मतामुळे भारतात स्थिर सरकार येईल. तुमचे एक मत डिजिटल क्रांतीला अधिक ऊर्जा देईल. दरम्यान, आमच्या सरकारने कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरमधील अनेक दशकांची प्रतीक्षा संपवली. ‘वन रँक वन पेन्शन’ लागु करुन चार दशकांची प्रतीक्षा संपवली. जीएसटीसारखी आधुनिक कर प्रणाली लागू केली. महिला आरक्षण अधिनियम लागू केले. असे म्हणत मोदी सरकारने घेतलेले प्रमुख निर्णय पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच निसर्गाचे रक्षण करतानाच विकास करता येतो, हे भारत आज जगाला दाखवत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी परिवारवाद या विषयावरही भाष्य केले आणि मतदारांना परिवारवादी पक्षांना पराभूत करण्याचे आवाहन केले. परिवारवाद हा एक आजार आहे जो देशातील तरुणांना पुढे जाण्यापासून रोखतो. इतर तरुणांना कौटुंबिक पक्षांमध्ये कधीच पुढे जाता येत नाही. त्यामुळे अशा घराणेशाही पक्षांना पराभूत करावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
१८ ते २५ वर्षे वय अनेक बदलांचे साक्षीदार असते. या बदलांमध्ये तुम्हा सर्वांना मिळून आणखी एक जबाबदारी पार पाडायची आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत सहभागी होण्याची ही जबाबदारी आहे. भारताचा सुवर्णकाळ सुरू झाला असताना तुम्ही सर्वजण मतदार झाला आहात. आणि २६ जानेवारीला आपला देश ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. पुढील २५ वर्षे तुमच्यासाठी आणि भारतासाठीही महत्त्वाची आहेत. आज जगात भारताची विश्वासार्हता एका नव्या उंचीवर आहे. भारताच्या पासपोर्टकडे जगभरात अभिमानाने पाहिले जाते. तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. गेल्या काही वर्षांत विक्रमी थेय परकीय गुंतवणुक भारतात आली आहे. भारताचा परकीय चलनाचा साठाही आज विक्रमी पातळीवर आहे. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, १३ जानेवारीला भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो नवमतदाता’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. या माध्यमातून देशातील अधिकाधिक तरुणाईपर्यंत पोहोचणे आणि प्रथम मतदान करणाऱ्या मतदारांसह तरुण मतदारांना पक्षासोबत जोडणे हा भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्देश आहे. दरम्यान, हा कार्यक्रम देशभरात विविध ठिकाणी थेट प्रक्षेपित करण्यात आला. लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमीवर भाजपने ‘तभी तो सब मोदी को चुनते है’ हे प्रचारगीत लाँच केले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या प्रमुख सरकारी योजनांचा उल्लेख आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, थेट लाभ हस्तांतरण, हर घर नल योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या गीतात दाखवण्यात आल्या आहेत.