अकोला,दि.25 : लोकशाही व्यवस्थेत आपले मत हा आपला आवाज असतो. त्यामुळे देशहितासाठी व विकासासाठी आपला मताधिकार प्रत्येकाने बजावलाच पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. राष्ट्रीय मतदारदिना निमित्त जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून अशोक वाटिका, बसस्थानक, गांधी मार्ग, पंचायत समिती मार्गे रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झाला. मताधिकाराचे महत्व पटविणारे फलक घेऊन बँड पथकासह विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीनंतर नियोजनभवन येथे रांगोळी स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे मोर्णा प्रवेशद्वारही मतदारदिन फलकांनी सजविण्यात आले. नियोजनभवनातील सभागृहालगतचा परिसर मतदानाचे महत्व सांगणा-या अनेक सुंदर रांगोळ्यांनी सजला होता. नियोजनभवनासमोर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या प्रात्यक्षिकातही विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रक्रिया समजावून घेतली.
मतदारदिनाचा मुख्य कार्यक्रम नियोजनभवनात झाला. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, मतदाराच्या सक्रिय सहभागावरच लोकशाहीचे यश अवलंबून असते. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी व विकासासाठी प्रतिनिधी निवडण्याची संधी मतदारांना निवडणूकीच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे मतदानाचा हक्क आपण बजावत नसू तर एक बहुमूल्य मत वाया जाते. त्यामुळे लोकशाही प्रक्रिया दृढ करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले. मतदानप्रक्रियेबाबत पुरस्कारप्राप्त माहितीपटही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
यानिमित्त मतदार जागृती पथनाट्याचे सादरीकरण झाले. विविध स्पर्धांतील गुणवंतांना बक्षीसांचे व नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचे वितरण झाले, तसेच सर्वांनी मतदारदिन प्रतिज्ञा घेतली. उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांचाही सत्कार झाला. न्यू इंग्लिश महाविद्यालय, राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, जि. प. प्राथमिक शाळा लोणी, लक्ष्मीबाई तोष्णीवाल महाविद्यालय, जिजाऊ कन्या विद्यालय, नूतन विद्यालय यांच्यासह अनेक शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. समन्वय अधिकारी गजानन महल्ले यांनी संयोजन केले. सुनील पाटील यांनी आभार मानले.