देशातील किरकोळ महागाई दर डिसेंबरमध्ये ५.६९ टक्क्यांपर्यंत चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. हा महागाई दर त्याआधीच्या महिन्यातील ५.५ टक्क्यांच्या तुलनेत काही प्रमाणात अधिक आहे, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आज शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) द्वारे मोजला जाणारा महागाई दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) २-६ टक्क्यांच्या मर्यादा पातळीत राहिला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महागाई दर अनुक्रमे ५.९३ टक्के आणि ५.४६ टक्के राहिला आहे. जो मागील वर्षी याच महिन्यात नोंदवलेल्या ५.८५ टक्के आणि ५.२६ टक्क्यांच्या तुलनेत अधिक आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा वाढला. तो आता सलग ५१ महिने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ४ टक्क्यांच्या मध्यम-मुदतीच्या लक्ष्यापेक्षा वर राहिला आहे.
डिसेंबरमध्ये भाजीपाला महागाईतही लक्षणीय वाढ झाली. त्यात नोव्हेंबरमधील १७.७ टक्क्यांवरून २७.६४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, इंधन आणि वीज महागाईत मागील महिन्यात (-) ०.७७ टक्क्यांच्या तुलनेत (-) ०.९९ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. डिसेंबरच्या पतधोरण बैठकीत आरबीआयने महागाईचे लक्ष्य ५.४ टक्क्यांवर ठेवले होते. ऑगस्टमध्ये आरबीआयने यंदाच्या आर्थिक वर्षातील महागाईचा सुधारित अंदाज दर ५.१ टक्क्यांवरून ५.४ टक्क्यांपर्यंत नेला होता.