मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ च्या राज्याच्या यादीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील पोस्ट मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला मिळालेल्या या यशाबद्दल राज्यातील जनता, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. ‘महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदान आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छ अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हिरो असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे या यशासाठी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
केंद्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांचा क्रमांक आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूरनं पहिलं स्थान कायम राखलं आहे, तर महाराष्ट्रातील तीन शहरांनी बाजी मारली आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये नवी मुंबईस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला. तर राज्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. यावर्षी इंदोर आणि सुरत शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यानंतर नवी मुंबईचा क्रमांक आहे.