अकोला,दि.10: अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मंगळवारी केलेल्या कारवाईत मूर्तिजापूर येथील विना परवाना गोदामातुन भेसळीच्या संशयावरून विविध अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मुर्तिजापूर येथील जुन्या कापड बाजारातील परवाना नसलेल्या दिनेश किशोर बजाज यांच्या गोदामातुन मिरची पावडर, रेड चिली सॉस, सोया सॉस, हक्का चायनिज नुडल्स व ए-वन स्विट हलवा (शाही ब्रॅड) हे अन्न पदार्थ विश्लेषणाकरीता घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला.
जप्त साठ्यामध्ये विनालेबल मिर्ची पावडर 10 किलो, रेड चिली सॉस विनालेबल 5 लीटरचे 15 कॅन, सोया सॉस विनालेबल 5 लीटरचे 24 कॅन, हक्का चायनीज नुडल्स 800 ग्रॅमची 37 पाकिटे व ए-वन स्विट हलव्याची (शाही ब्रॅड) 10 किलोची 8 पाकिटे असा एकूण 26 हजार 670 रू. चा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे, एृ- वन स्वीट हलवा (शाही ब्रँड) अस्वच्छ परिस्थितीत साठवलेला आढळला. या हलव्याचा नमुना घेवुन उर्वरित 78 किलो असा 17 हजार 160 रू. किमतीचा साठा नष्ट करण्यात आला. नमुने शासकीय प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविले असुन विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे श्री. नवलकार यांनी कळविले.