अकोला, दि.8 : जिल्ह्यात महत्वाची, तसेच अधिकाधिक विकासकामे होण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिली. जिल्हा वार्षिक योजनेबाबत राज्यस्तरीय बैठक वित्त व नियोजन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हेही यावेळी उपमुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते. आमदार रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., व विविध विभागप्रमुख आदी सभागृहात उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, आवश्यक विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नाही. प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची कार्यवाही गतीने पूर्ण करून कामांना चालना द्यावी. जिल्हा नियोजन समितीच्या मागणीनुसार महत्वाच्या सर्व विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासकार्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली. याबाबत सकारात्मकपणे निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध महत्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून देशाच्या विकासप्रक्रियेला गती दिली आहे. जिल्ह्यातही केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले. अंगणवाडीच्या बांधकाम खर्चासाठी आवश्यक निधी निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेतून नियोजित कामांसाठी निधीची जिल्ह्याची कमाल मर्यादा २१६ कोटी रू. आहे. जिल्ह्यात शाळा, पूल दुरुस्ती, वीज ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती, ग्रामीण रस्ते, शेतरस्ते, यात्रास्थळ विकास, महापालिकेत समाविष्ट नविन गावांत सुविधा आदी विविध कामांसाठी १३९ कोटी रू.ची अतिरिक्त मागणी असल्याने कमाल मर्यादा वाढवून मिळावी, असे जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी सांगितले.