“गेली २१ वर्षांहून अधिक काळ सचिन तेंडुलकर याने देशाचे क्रिकेटचे ओझे वाहून नेले आहे. त्यामुळेच आज आम्ही त्याला खांद्यावर उचलत त्याचा भार आमच्या खांद्यावर घेतला,” अशा शब्दांमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने २०११ विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होते. त्याचवेळी विराटने अप्रत्यक्षपणे देशवासीयांना शब्द दिला हाेता की, आपण सचिन तेंडुलकर याच्या फलंदाजीचा वारसा पुढे नेणार आहोत. गेली अनेक वर्ष आपल्या फलंदाजीमध्ये लक्षणीय सातत्य राखत विराटने आपल्या शब्दाला जागला आहे. आज क्रिकेटमधील विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याच्या एकदिवसीय (वन-डे ) क्रिकेटमधील ४९ शतकाचा विक्रमही विराटने मोडित काढला आहे. विशेष म्हणजे, निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरनेही माझा विक्रम विराट कोहली किंवा रोहत शर्मा मोडेल, असे भाकित केले होते. आज विराटने आपल्या अविस्मरणीय खेळीने सचिनचाही शब्दही खरा केला आहे. त्यामुळेच वन-डेतील विश्वविक्रमी शतकी खेळीनंतर विराटने केलेल्या अभिवादनानंतर क्रिकेटचा ‘देव’ सचिन तेंडुलकरही भारावला.
२०११ च्या विश्वचषक विजयाचे स्मरण…
टीम इंडियाने २०११ मध्ये अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराटने सचिनला आपल्या खांद्यावर घेऊन वानखेडे मैदानावर फेरी मारली होती. यावेळी विराटने म्हटलं होतं की, “सचिन तेंडुलकरने २१ वर्षांहून अधिक काळ देशाचे क्रिकेटचे ओझे आपल्या खांद्यावर वाहून नेले आहे. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी त्याने तब्बल २२ वर्षांहून अधिक काळ परिश्रम घेतले आहेत.” आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरच विराट काेहलीने सचिन तेंडुलकरसमाेर आपल्या नावावर वन-डेतील विश्वविक्रमी शतक केले. यावेळी पुन्हा एकदा २०११ मधील विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यावेळी विराट काेहलीने सचिनबाबत केलेल्या विधानाचे स्मरण झाले.
एककाळ असा होता की, मी सचिनला फक्त टीव्हीवर पाहायचो…
सचिनच्या ४९ शतकांच्या विक्रमाशी बरोबर केली तेव्हा विराट म्हणाला होता की, ” मला माहिती आहे मी कुठून आलो आहे. एक काळ असा होता की, सचिनला मी फक्त टीव्हीवर पाहायचो. त्याची फलंदाजी पाहताना आनंद वाटायचा. माझ्या लाडक्या हिरोकडून या कामगिरीवर भाष्य करणे ही माझ्यासारख्या खेळाडूसाठी फार मोठी गोष्ट आहे. त्याच्या विश्वविक्रमाच्या बरोबरी करणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ज्या खेळाडूला आपण पाहून मोठे झालो, त्याच्या विक्रमांशी बरोबरी करणं ही फार मोठी गोष्ट असते.