२०२० मध्ये कोरोनाचे संकट आले आणि संपूर्ण जगाचे आरोग्याला संकटाच्या घाईत लोटले गेले. कारेोना प्रतिबंधक उपायांनंतरही जगभरात लाखो नागरिकांचा हा विषाणूने बळी घेतला. कोरोना संसर्ग झालेले आणि यातून बचावलेल्या रुग्णांनीही आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरे जावे लागत असल्याचेही समोर येत आहे. अशातच मागील दोन वर्षांमध्ये हृदयविकाराने होणार्या मृत्यूंच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हृदयविकाराने होणार्या मृत्यूंचा कोरोनाशी संबंध आहे का? या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यासाचा हवाला एक सल्ला दिला आहे.
किमान दोन वर्षे तरी अतिश्रम टाळावेत
मागील काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये हृदयविकारामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: नवरात्रीच्या गरबा इव्हेंटमध्ये गुजरातमध्ये असे मृत्यू अधिक झाले. भावनगर लोकसभा मतदारसंघातील तरुणांसाठी आयोजित केलेल्या संसद खेलमहोत्सव 2023 च्या समारोप समारंभात बोलताना मांडविया म्हणाले की, ” आयसीएमआरने हृदयविकाराने होणार्या मृत्यूंचा कोरोनाशी संबंध आहे का? यावर सविस्तर अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार ज्यांना कोरोना संसर्गाचा अधिक त्रास सहन करावा लागला आहे त्यांनी जास्त मेहनत करू नये. त्यांनी अधिक शारीरिक परीश्रम , धावणे आणि अति व्यायामापासून थोड्या काळासाठी दूर राहावे. किमान एक किंवा दोन वर्षे अति शारीरिक श्रमापासून लांब राहावे, म्हणजे हृदयविकाराचा झटका टाळता येईल.”
गुजरातमध्ये सातत्याने हृदयविकाराच्या झटक्याची नोंद होत आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या भेटीदरम्यान सांगितले होते की, सरकारने हृदयविकाराच्या प्रकरणांचे विश्लेषण केले पाहिजे. राज्यात नवरात्रोत्सवादरम्यान गरब्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचीही अनेक नोंदी झाली आहेत.
गंभीर कोरोना संसर्ग झालेल्यांनी अति व्यायाम टाळावा
मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ज्यांना गंभीर कोविड-19 संसर्ग झाला होता त्यांनी हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी एक किंवा दोन वर्षे जास्त मेहनत करू नये. गुजरातमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान गरबा खेळताना झालेल्या घटनांसह हृदयाशी संबंधित समस्यांमुळे राज्यात अलीकडे अनेक मृत्यू झाले आहेत.सर्वात जास्त हृदयविकाराच्या रुग्णांची नोंद सौराष्ट्रात झाली आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत गुजरात राज्यात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये झालेली वाढ हे चिंतेचे कारण बनले आहे. हृदयविकाराचा झटका बसलेल्यांमध्ये खेडा जिल्ह्यातील वीर शाह, अहमदाबाद येथील २८ वर्षीय रवी पांचाल आणि वडोदरा येथील ५५ वर्षीय शंकर राणा यांचा समावेश आहे. या घटनांमुळे कोविड-19 चे दीर्घकालीन परिणाम, त्याचे उपचार आणि व्यक्तींच्या हृदयाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत प्रश्न आणि चिंता निर्माण झाल्या आहेत.
हृदयविकाराच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेचे निराकरण करण्यासाठी, राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने गरबा इव्हेंट आयोजकांना नवरात्रोत्सवादरम्यान एक रुग्णवाहिका आणि एक वैद्यकीय पथक जागेवर असणे बंधनकारक केले, ज्यामुळे सहभागींना त्वरित मदत मिळेल.
ICMR चा अभ्यास काय सांगतो?
ज्यांना गंभीर कोविड-19 संसर्ग झाला त्याना हृदयविकाराचा त्रास होतो का? याविषयी कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यास केला. यामध्ये ज्यांना गंभीर COVID-19 संसर्गाचा सामना करावा लागला आहे त्यांच्यासाठी, आरोग्याचे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच रुग्णांनी आरोग्याला प्राधान्य देताना हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नये, असेही हा अभ्यास सूचवितो.