नागपूर : बांगलादेशच्या सीमेवरून देशात सोन्याची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या अफलातून लॉकरचा भांडाफोड डीआरआयने केला आहे. भांडाफोड करणाऱ्या या सोने तस्करी केलेले सोने मुंबई, नागपूर, वाराणसी शहरांकडे पाठवले जात होते. यात गुंतलेल्या ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १९ कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत पेस्ट स्वरूपात सोन्याची आखाती देशातून हवाई मार्गाने तस्करी पुढे आल्यानंतर आता रेल्वे, रस्ते मार्गानेही मोठी तस्करी उघडकीस आली आहे. नागपुरात आझाद हिंद एक्स्प्रेसमधून आलेल्या आणि आपल्या लक्ष्याच्या शोधात पसार होण्याच्या प्रयत्नात दोघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या टोळीतील इतरांचा छडा लागला. या तस्करांनी वाहनांच्या हँड ब्रेक आणि गेअरबॉक्सजवळ सोने तस्करीसाठी खास लॉकर तयार करून घेतले होते. वाहनांची तपासणी करताना ते सहज दृष्टिपथात येणार नाहीत, असाच त्यांचा कयास होता. मात्र, त्यांचे बिंग फुटले. गेल्या अनेक दिवसांपासून याच पद्धतीने हो सोने तस्करी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दि. १३ आणि १४ ऑक्टोबररोजी वाराणसी, नागपूर आणि मुंबई या तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत ३१.७ किलो सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत सुमारे १९ कोटी रुपये आहे.
नागपूर डीआरआयच्या पथकाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना कोलकाताहून निघालेल्या रेल्वेमधून नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर उतरताना पकडले. त्यांच्याकडून ८.५ किलो वजनाचे विदेशी चिन्हांकित सोने जप्त करण्यात आले. या तस्करांच्या चौकशीनंतर डीआरआयच्या पथकाने तस्करीच्या सोन्याच्या दोन खरेदीदारांची ओळख पटवून त्यांना सुद्धा ताब्यात घेतले. दरम्यान, वाराणसी येथील डीआरआयच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर ३ तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर आणि जंगलातील शोध मोहिमेनंतर वाहनासह दोन आरोपींना पकडले.
त्या दोघांकडून आणि कारच्या हँडब्रेकच्या खाली बनवलेल्या लॉकरमधून १८.२ किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले. आणखी एका कारवाईत वाराणसीहून रेल्वेने सोने घेऊन निघालेल्या पाच आरोपींना शोधण्यात मुंबईच्या पथकाला यश आले. या पथकाने त्यांच्याकडून ४.९ किलोग्रॅम सोने जप्त केले. यासंदर्भात डीआरआयने मुंबईत पाच, वाराणसीत दोन आणि नागपुरमध्ये चार अशा एकूण ११ जणांना अटक केली.