अकोला,दि. 9 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयातील कंत्राटी कर्मचारी भरण्यासाठी नविन शासन निर्णयानुसार तात्काळ प्रस्ताव सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नुकतेच दिले. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी रूग्णालयाची पाहणी करून आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रवीण सपकाळ यांच्यासह विविध विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी, औषधनिर्माता आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, रूग्णालयात अतिआवश्यक औषध साठ्याच्या नियमित उपलब्धतेसाठी आवश्यकतेनुसार खरेदीच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करावी. रूग्णालयात पुरेसा औषधसाठा व यंत्रणा सुसज्ज ठेवावी. पुरेशा मनुष्यबळासाठी कंत्राटी कर्मचारी भरतीचा प्रस्ताव त्वरित सादर करावा. रूग्णसेवेत कुठेही उणीव राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. रुग्णालयात नियमित स्वच्छता ठेवावी.
आरोग्य यंत्रणेने कोरोनाकाळात अविरत सेवा बजावली आहे. यापुढेही सर्वांनी अशीच सकारात्मकता व संवेदनशीलता बाळगून कार्य करावे. सर्वांनी एक ‘टीम’ म्हणून समन्वयाने काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.
बालरोगशास्त्र विभागाला कक्ष क्र. 32 ही जागा मिळण्याबाबत, तसेच औषधवैद्यकशास्त्र विभाग इतर कक्षात स्थलांतराबाबतही यावेळी चर्चा झाली. त्याचप्रमाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिका-यांनी आरोग्य यंत्रणेबाबत विविध विषयांची माहिती घेतली.