व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर २०९ रुपयांनी वाढले आहेत. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी शनिवारी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत अशा सिलिंडरची किरकोळ किंमत वाढीनंतर आता 1,731.50 रुपये होईल, असे सूत्रांनी सांगितले. सणासुदीच्या काळात अन् ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ‘एलपीजी’ महागल्याने सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २०९ रुपयांनी वाढ करून मोठा धक्का दिला आहे. दरम्यान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केंद्र सरकारने शनिवारी(दि.३०) घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमत वाढीसंदर्भात माहिती दिली आहे.
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या २०९ रुपयांच्या वाढीनंतर नवी दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,७३१.५० रुपये इतकी होणार आहे. गेल्या महिन्यात १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५७ रुपयांची कपात करण्यात आली होती. आता एका महिन्यातच सिलेंडरच्या किंमतीत २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या सुधारित किमती १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच लागू होतील, असेही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
व्यावसायिक LPG च्या वाढत्या किंतींचा ग्राहकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण गॅस वितरण कंपन्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि पाइप्ड नॅचरल गॅसच्या (PNG) किंमती वाढवू शकतात. घरगुती नैसर्गिक वायूच्या किमती सलग दुसऱ्या महिन्यात वाढल्या आहेत. त्याचबरोबर एलपीजीच्या दरातही वाढ होत आहे. त्यामुळे CNG आणि PNG या दोन्ही गॅसच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे.