चंद्रपूर : आतापर्यंत एका खासगी कंपनीकडून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन सफारीला येणारे पर्यटक ऑनलाईन बुकींग करीत होते. परंतु जिल्हा व सत्र न्यायालयाने ताडोबा व्यवस्थापनाने आपल्या पोर्टलद्वारे ताडोबाची ऑनलाईन सफारीची बुकींग करावी असा महत्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर ताडोबा व्यवस्थापन यापूढे लवकरच ऑनलाईन बुकींग स्वत:च्या एनआयसी शासकीय पोर्टलद्वारे करणार आहे. पर्यटन सफारीचे ऑनलाईन बुकींगचे कंत्राट असलेल्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीने सुमारे 12 कोटीची अफरातफर केल्यानंतर ताडोबा प्रशासनाने सदर कंपनीचे कंत्राट संपविल्यानंतर कोर्टान हा निर्णय दिला आहे, अशी माहिती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जिंतेंद्र रामगावकर यांनी दिली.
10 डिसेंबर 2021 ते 17 ऑगस्ट 2023 कालावधीतील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचे ऑनलाईन बुकींग करण्याकरीता चंद्रपूर येथील चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. सदर कंपनी ही अभिषेक विनोदकुमार ठाकुर, रोहीत विनोदकुमार ठाकुर रा. चंद्रपूर यांच्या मालकीची आहे. ताडोबा प्रशासन व कंपनीमध्ये सर्विस लेवल अर्गिमेंटद्वारे अटी व शर्तीवर कायदेशीर करार झाल्यानंतर कंपनी पर्यटकांची सफारीची ऑनलाईन बुकींग करीत होती. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठा चंद्रपूर (टी.ए.टी.आर.) यांनी, सन 2020-21, 2021-22, 2022-23 व सन 2023-24 या वर्षात केलेल्या लेखापरीक्षणात 12 कोटी 15 लाख 50 हजार 831 रुपये कंपनीने टी.ए.टी.आर. ला भरणा केली नाही. करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करून कंपनीने सुमारे बारा कोटीची अफरातफर केल्याचे उघड झाल्यानंतर ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी सचीन शिन्दे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीचे आरोपी अभिषेक विनोदकुमार ठाकुर व रोहीत विनोदकुमार ठाकुर यांचे विरोधात कलम 420, 406 भादंविचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून दोन्ही आरोपी ठाकूर बंधू पसार झाले आहेत. अद्याप ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
ताडोबा प्रशासनाने चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीचा कंत्राट पुर्णत: संपुष्ठात आणल्यानंतर कंपनीने न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाला या बाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याने ताडोबा व्यवस्थापन प्रशासनाला व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारीची ऑनऑईन बुकींग तात्पुरती थांबवावी लागली होती. तेव्हापासूनच सध्या ऑनलाईन बुकींग बंद आहे. सध्या ताडोबात बफरझोनमध्येच पर्यटन सफारी सुरू असल्याने त्या ठिकाणी ऑफलाईन बुकींगद्वारे सफारी सुरू आहे. कोअर झोनमध्ये दरवर्षी पावसाळ्यात 30 सप्टेंबर पर्यंत ताडोबातील कोअरझोनमधील पर्यटन सफारी ही बंद असते, सध्याही बंदच आहे. परंतु पुढे सणासुदीचे दिवस येणार आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात ताडोबाकडे येतात. त्यामुळे ऑनलाईन बुकींग बंद राहणे ताडोबाला प्रशासनाला आर्थिक अडचणीचे ठरणार होते. परंतु जिल्हा व सत्र न्यायालयाने यावर तोडगा काढीत ताडोबा व्यवस्थापनाने आता स्वत:च्या पोर्टलद्वारे ऑनलाईन बुकींग करण्याचा निर्णय दिल्याने ताडोबाला स्वत:च्या पोर्टलद्वारे ऑनलाईन बुकींग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीने ऑनलाईन बुकींग मध्ये सुमारे बारा कोटींची अफरातफर केल्यानंतर ताडोबा प्रशासनाने त्यांचा कंत्राट रद्द करून स्वत: एनआयसीची ऑनलाईन बुकींगसाठी यंत्रणा सज्ज ठेवली होती. परंतु कोर्टाच्या आदेशाची वाट निर्णयाची प्रतिक्षा होती. नुकत्याच आलेल्या निर्णयामुळे ताडोबा प्रशासनाला आता स्वत:च्या एनआयसी पोर्टद्वारे ऑनलाईन करणे सोपे जाणार आहे. शिवाय पर्यटकांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नसल्याचे ताडोबाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले आहे.
कंपनीच्या काळात अधिकृतरित्या बुकींग केलेल्या पर्यटकांना सफारीचा लाभ देण्यात येत आहे. अशा पर्यटकांसाठी अडचण जाणवू नये याकरीता ताडोबाचे फॅसिलेशन सेंटर, कॉल सेंटर, वेबसाईड, इमेल व फोन सुविधा उपलब्ध केली आहे. पर्यटकांना कोणताही त्रास सहन होणार नाही, याबाबत ताडोबा प्रशासन काळजी घेत आहे.
कोर्टाच्या निर्णयानुसार, 1 ऑक्टोबर पासून कोअरझोनमध्ये पर्यटन सुरू होणार आहे. ही ऑनलाईन बुकींग आता ताडोबाला स्व:तच्या एनआयसी पोर्टलद्वारे करता येणार आहे. सणासुदीच्या दिवसात ताडोबाच्या महसुलाल ऑनलाईन बुकींग अभावी मोठे आर्थीक नुकसानीचा धोका वर्तविण्यात येत होता. परंतु हा धोका ताडोबा व्यवस्थापन स्व:तच्या पोर्टलद्वारे ऑनलाईन बुकींग करणार असल्याने टळला आहे. चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीचे आरोपी अभिषेक विनोदकुमार ठाकुर, रोहीत विनोदकुमार ठाकुर रा. चंद्रपूर यांचा अटकपूर्ण जामिन फेटाळल्यानंतर अद्याप दोन्ही आरोपी ठाकूर बंधू पोलिसांच्या हाती गवसले नाहीत. त्यांचा शोध सुरूच आहे.