अकोला, दि. 31 : दिव्यांग बांधवांसाठी दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय शिबिर होणार आहे. त्याअनुषंगाने दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या विविध थेट कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. महामंडळामार्फत 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या पात्र व्यक्तींसाठी कर्ज व अर्थसाह्य योजना राबविल्या जातात.
दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना :
फरिदाबाद येथील राष्ट्रीय महामंडळामार्फत दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजनेत विविध लघुउद्योगांसाठी 50 हजार ते 5 लाख अर्थसाह्य वार्षिक व्याजदर 5 ते 9 टक्के दराने उपलब्ध करून दिले जाते.
वैयक्तिक थेट कर्ज योजना :
राज्य महामंडळामार्फत 50 हजार रू. पर्यंत कुटीर उद्योगांसाठी वार्षिक व्याजदर 2 टक्के दराने कर्ज दिले जाते.
महाशरद वेब पोर्टल :
दिव्यांग व्यक्तींना महाशरद वेब पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केल्यास विनामूल्य सहायक साधने, उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना व वैयक्तिक थेट कर्ज योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून, महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. हे कार्यालय डी. के. साठे यांची इमारत, मोहन भाजी भांडार चौक, तापडियानगर येथे आहे.