दोन आठवड्यांहून अधिक काळाच्या विश्रांतीनंतर राज्यातील काही भागांत पावसाने तुरळक हजेरी लावण्यास सुरु केले आहे.भारतीय हवामान विभागाने आज (दि.२९) प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार उद्या (दि.२९ ऑगस्ट) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची अधिक शक्यता आहे.
हवामान विभागाच्या बुलेटिननुसार, रायगड, रत्नागिरीसह अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत बुधवारी (दि.२९ ऑगस्ट) ‘यलो अलर्ट‘ देण्यात आला आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यांसह गडगडाटी पावसाची अधिक शक्यताआहे. तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत २ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
३ सप्टेंबरपर्यंत राज्यात हलक्या पावसाचा अंदाज
आगामी पाच दिवस राज्यांत हलक्या पावसाची शक्यता असून, सप्टेंबरची सुरुवात पावसाने होण्याचा अंदाज आहे. मंगळवारी २९ ऑगस्ट ते रविवारी ३ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा अंदाज आहे. देशात उत्तर प्रदेश व राजस्थान वगळता उर्वरित सर्वत्र हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात, तर मध्य भारतात पुन्हा पश्चिमी वार्याची ताकद वाढल्याने पाऊस पुन्हा सुरू झाला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.