अकोला,दि.11 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच सफाई कामगार यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी कर्ज, अनुदान, प्रशिक्षण व उच्च शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येतात. त्यांचा लाभ जिल्ह्यातील पात्र व्यक्तींनी घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना
या योजनेत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील पात्र व्यक्तींसाठी विविध कुटीर उद्योगासाठी 50 हजार रू.पर्यंत बँकेमार्फत अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येते. महामंडळामार्फत 10 हजार रू. अनुदान मिळते. उर्वरित रक्कम बँक कर्जाची असते. सन 2023-24 या वर्षात 100 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे.
बीजभांडवल योजना
या योजनेत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील पात्र व्यक्तींसाठी विविध लघु उद्योगांसाठी 50 हजार ते पाच लाख रू. पर्यंत बँकेमार्फत अर्थसहाय्य मिळते. महामंडळामार्फत एकूण मंजूर प्रकल्पाच्या 20 टक्के बीजभांडवल रक्कम वार्षिक 4 टक्के व्याजदराने व 10 हजार रू. अनुदानासह मिळते. अर्जदार सहभाग 5 टक्के व उर्वरित रक्कम बँक कर्जाची असते. चालू वर्षासाठी जिल्ह्यात 100 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे.
प्रशिक्षण योजना
आर्थिक स्थितीने शिक्षणात खंड पडला असे व जे उमेदवार कौशल्य प्रशिक्षण मिळवू इच्छितात अशा अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील व्यक्तींना लघु कालावधीचे विविध व्यावसायिक प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. प्रशिक्षण कालावधीत तीन हजार रु. विद्यावेतनही मिळते. यंदा जिल्ह्यासाठी 400 व्यक्तींना प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.
एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजना
राष्ट्रीय अनुसूचित जाती व वित्त विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणासाठी देशात, तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज मिळते. देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 20 लाख रू. पर्यंत तसेच देशाबाहेर जाण्यासाठी 30 लाख रू. कर्ज मंजूर करण्यात येते. कर्जावर 4 टक्के व्याज आकारणी होते. विद्यार्थिनींकडून 3.5 टक्के व्याज आकारले जाते.
एनएसकेएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजना
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळामार्फत सफाई कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणासाठी देशात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10 लाख रू. पर्यंत तसेच परदेशी शिक्षणासाठी 20 लाख रू. कर्ज मंजूर मिळू शकते. कर्जावर विद्यार्थ्यांकडून 4 टक्के व विद्यार्थिनींकडून 3.5 टक्के दराने व्याज आकारले जाते.
एनएसकेएफडीसी मुदती कर्ज योजना
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळामार्फत सफाई कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना विविध व्यवसायाकरिता एक ते 15 लाख रू. एवढ्या प्रकल्प मर्यादेत कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यावर वार्षिक 6 ते 8 टक्के व्याज आकारणी होते. यंदा जिल्ह्यासाठी 81 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे.
एनएसकेएफडीसी एसआरएमएस योजना
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळातर्फे 2017-18 मध्ये झालेल्या सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात स्वयंघोषित अस्वच्छ सफाई कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना विविध व्यवसायांसाठी एकूण 1 कोटी 80 लक्ष रू. वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. या कर्जावर वार्षिक 6 ते 8 टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी होते. त्याशिवाय, एनएसकेएफडीसी व एसआरएमस योजनेतही अनुदान मिळते. इच्छूक व पात्र व्यक्तींनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://nbrmahapreit.in तसेच https://mpbcdc.maharashtra.gov.in वर नोंदणी करून कर्ज मागणी अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, द्वारा डी.के.साठे, मोहन भाजी भांडार चौक, तापडियानगर अकोला येथे संपर्क साधावा.