अकोला,दि. 11 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मंगळवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण होईल. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहतील.
ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन
विविध शासकीय, निमशासकीय, अशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, प्राधिकरणे, संस्थांनी ध्वजारोहण करताना भारतीय ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करावे. अनेकदा प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो. अशा वापरावर ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार बंदी आहे. असा वापर कुणी केल्याचे आढळल्यास वापरकर्ता, उत्पादक, वितरक व मुद्रकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण, खराब झालेले किंवा रस्त्यावर, मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत. राष्ट्रध्वजाची परस्पर विल्हेलाट लावणे हा अवमान असून, तसे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, पालक, नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.