अकोला, दि. 7: देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम दि. 9 ते 15 ऑगस्टदरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. ‘मेरी माटी मेरा देश ‘ हा भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम आहे. गेल्या वर्षी आयोजित “हर घर तिरंगा” या देशव्यापी अभियानाला जिल्ह्यात चांगले यश मिळाले. शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे , मिट्टी का नमन, पंचप्राण प्रतिज्ञा आणि वीरों का वंदन याबरोबरच यावर्षीही हर घर तिरंगा अभियान दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान आयोजित केले जाणार आहे. लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, नागरिक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील, या कृतीतून भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रती आदर व्यक्त करणे यावर लक्ष केंद्रित करून पंच प्राणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतली जाईल. अशाप्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघर सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवावा. तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करता येईल. मोहिमेचा तपशील https://yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर पाहता येईल. सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रमांतूनही मोहिमेत सहभागी होता येईल. अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.