वर्धा : आपसी वाटणीपत्र करून देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना देवळी येथील नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडले. मंगळवारी (दि. २) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. देवळी तालुक्यातील तक्रारदाराच्या वडिलोपार्जीत शेतीचे दोन भावांच्या नावे आपसी वाटणीपत्र करावयाचे होते. त्याकरिता नायब तहसीलदार किशोर शेंडे यांनी लाचेची मागणी केली. किशोर शेंडे यानी तीन हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा रचला. नायब तहसीलदार किशोर शेंडेंना तीन हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडत अटक करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.