अकोला, दि. 2 : स्पर्धा परीक्षा किंवा कुठल्याही कार्यात यश मिळविण्यासाठी योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन व त्यानुसार कठोर मेहनत यांची सांगड घालणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे सांगितले.
महसूल विभागामार्फत आयोजित महसूल सप्ताहात ‘युवा संवाद’ कार्यक्रम नियोजन सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परांडेकर, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, तहसीलदार अविनाश शिंगटे, समन्वय अधिकारी गजानन महल्ले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. यश मिळविण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. तथापि, योग्य दिशेने प्रयत्न होण्यासाठी अचूक नियोजन व वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महसूल खात्याच्या कामकाजाची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाबरोबरच मतदार म्हणून कर्तव्य पार पाडण्याचे आवाहनही यावेळी नवमतदारांना करण्यात आले. विविध महाविद्यालयांचे 300 हून विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.