मुंबई : राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआय मध्ये यंदा ३ हजार ४०० जागांची वाढ होणार आहे, याचा फायदा यंदा प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. नवी दिल्ली येथील प्रशिक्षण संचालनालय यांच्या अॅफिलिएशन व अॅक्रेडिशन समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील २६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ६७ नवीन तुकड्या व तसेच १३ नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून १०३ नवीन तुकड्या सुरू करण्यासाठी संलग्नता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे राज्याच्या आयटीआयच्या प्रवेश क्षमतेमध्ये सुमारे ३ हजार ४०० जागांची वाढ होणे अपेक्षित आहे.
सलग्नता देण्यात आलेल्या व्यवसायांमध्ये सर्वाधिक तुकड्या वीजतंत्री व्यवसायाच्या ५४ तुकडया, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटच्या ०९, फिटर व्यवसायाच्या २०, वायरमन व्यवसायाच्या २४, वेल्डर व्यवसायाच्या १०, सोलर टेक्निशिअन व्यवसायाच्या ०६ व इतर व्यवसायांच्या ४७ तुकड्यांचा समावेश आहे. संलग्नता आदेश प्राप्त होताच प्रवेशाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत १३ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना वर्षातील तीन ते सहा महिने प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये जाऊन ऑन द जॉब ट्रेनिंग घेण्याची संधी मिळते. यामुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या कौशल्यात विशेष सुधारणा होण्यास मदत होईल, अशी माहिती व्यवसाय प्रशिक्षण संचालयाच्या वतीने देण्यात आली.