अकोला,दि. 24 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) 2023 या वर्षासाठी युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रत्येकी 50 हजार रू. एकरकमी अर्थसाह्य देण्यात येत आहे.
युपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर झाला. त्यानुसार ‘महाज्योती’मार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी 356 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 314 विद्यार्थी पात्र ठरले. यापैकी 298 विद्यार्थ्यांच्या खात्यात 50 हजार रू. जमा करण्यात आले आहेत. त्यानुसार सुमारे 1 कोटी 49 लक्ष रू. निधीचे विद्यार्थ्यांना वितरण झाले आहे. उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बँक तपशील सादर केल्यावर त्यांनाही साह्य वितरीत केले जाणार आहे.
लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा ही दि.15 सप्टेंबरला होणार असून अर्थसाह्य वितरीत केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती ‘महाज्योती’चे नागपूर येथील प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी दिली.