राज्यातील जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमध्ये 50 हजार शिक्षकांची भरती होणार लवकरच केली जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज पुण्यात सांगितले. यामध्ये पहिल्या टप्प्यात 30 हजार, तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच निवृत्त होणाऱ्या शिक्षकांकडून देखील काम करून घेतलं जाणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र मॉडेल देशात वापरलं जात आहे. सध्या राज्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार काम केलं जात आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थी किती असतात, यावर काही नियंत्रण नसतं. त्यामुळे सर्व शाळेवर आता कॅमेरे लावले जातील, असं देखील केसरकर म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा घसरल्याबद्दल राज्य सरकारला लिहलेल्या पत्राबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, शरद पवार यांनी उपस्थित केले मुद्दे गांभीर्याने घेतले जातील. पवार यांच्याबरोबर बैठक घेऊन शिक्षण विभागाच्या कामाबद्दल सविस्तर माहिती त्यांना देण्यात येईल. तसेच राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाचे स्वागत करतो, असं देखील केसरकर म्हणाले.