ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांचे मेळावे आगामी काळात होणार आहेत. या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात गुरुवारपासून ठाण्यातून होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचा मेळावा उद्या सायंकाळी ६ वा. टिप-टॉप प्लाझा येथे होणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली
संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या टप्प्यात पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई येथे मेळावे घेणार आहेत.
या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून होणार आहे. तरी या मेळाव्यासाठी ठाण्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि समस्त शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे.