पुणे : गलेलठ्ठ पगारासाठी लाखो रुपयांचे डोनेशन भरून विद्यार्थी बीई, बीटेकच्या आयटी, सीएस किंवा संगणकाशी संबंधित अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. परंतु आयटीपेक्षाही कितीतरी अधिक पॅकेज आयटीआय करणार्या विद्यार्थ्यांना मिळाल्याचा प्रकार राज्यात घडला आहे. राज्यातील विविध आयटीआयमध्ये शिक्षण घेणार्या 37 विद्यार्थ्यांची जर्मनीतील ड्युअल डिग्री साठी निवड झाली असून, त्यांना प्रशिक्षण काळात 10 लाखांचे, तर त्यानंतर 28 लाख 80 हजार रुपयांचे पॅकेज मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्य शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दरवर्षी आयटीआयला जागांच्या दुप्पट ते तिप्पट अर्ज येत असतात. आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांना केवळ देशातच नाही, तर परदेशात नोकरीच्या संधी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. राज्याचे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डी. ए. दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी-बारावीनंतर काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडतोच. सगळेच काही डॉक्टर, इंजिनिअर होत नाहीत.
याशिवाय ही अनेक अशी कौशल्ये आहेत जी विद्यार्थ्यांच्या अंगी असतात; परंतु त्यांना त्याची जाणीव नसते. ही अंगभूत कौशल्ये योग्य पद्धतीने विकसित झाली की जगाच्या पाठीवर कुठेही विद्यार्थी आपली ओळख निर्माण करू शकतात. सध्या जगभर तरुण कुशल मनुष्यबळाची उणीव भासत आहे. त्यामुळे आय. टी.आय. प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना चांगली संधी आहे.
नुकतेच नाशिक, पुणे,औरंगाबाद या शासकीय आय. टी.आय. आणि साईबाबा संस्थान आय. टी.आय. शिर्डी तसेच लालजी मेहरोत्रा प्रा.आय. टी.आय. जोगेश्वरी पूर्व, मुंबई या संस्थेतील एकूण 37 आय. टी.आय. अर्हताधारक उमेदवारांना जर्मनीतील ड्युअल डिग्रीचे निवड पत्र देण्यात आले. त्यांना प्रशिक्षण काळात 84 हजार महिना विद्यावेतन आणि त्यानंतर महिना 2 लाख 40 हजार रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे आयटीआय अभ्यासक्रमांना जागतिक महत्त्व प्राप्त होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जपानमध्ये मशिन ऑपरेटरच्या नोकरीची संधी
आयटीआयच्या मशिनिस्ट/ टर्नर/ फिटर/ मशिन टूल मेंटेनन्स या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना जपानमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ही नोकरी भारत आणि जपान यांच्यातील टीआयटीपी करारानुसार आहे. नोकरीचा कालावधी 5 वर्षांचा असेल. पगार भारतीय चलनानुसार दरमहा किमान एक लाख रुपये मिळणार आहे. अधिक माहितीसाठी औंध आयटीआयमध्ये संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर्मनीमध्ये ड्युअल डिग्रीसाठी औंध आयटीआयच्या विद्यार्थ्यांची निवड झाली.
औंध आयटीआयमधील आर्यन जोशी, वैजुनाथ चौगुले, ईश्वर नरवटे,अवधुत पवार या विद्यार्थ्यांची जर्मनीमध्ये ड्युअल डिग्रीसाठी निवड झाली आहे. तसेच परदेशात आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जर परदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यांना औंध आयटीआयच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.