अकोला,दि.26 : जिल्ह्यात प्राण्यांची वाहतूक करतांना प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.
बकरी ईद या सणाच्या पार्श्वभुमिवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यानुसार बकरी ईद हा सण गुरुवार दि. 29 जून रोजी (चंद्र दर्शनानुसार) साजरा होणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी निर्देश दिले की, प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलवबजावणी करावी. तसेच राज्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976, महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा 1995, गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. या सर्व कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. जनावरांची वाहतूक करताना वाहतूक अधिनियमानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरांची स्वास्थ तपासणी केल्याचे व जनावर वाहतूक योग्य असल्याचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी. बकरी ईदच्या दिवशी जिल्ह्यात कुठेही जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल होणार नाही ,तसेच कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर पोलीस, महसूल, परिवहन व पशुसंवर्धन विभागाची पथके स्थापन करावे, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.