अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रीगन येथे भारतीय प्रवासींना मार्गदर्शन केले. यावेळी भारतातून चोरलेल्या १०० दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू (100 antiquities of India) आणि दुर्मिळ कलाकृती परत करण्याच्या अमेरिकन सरकारच्या निर्णयावर त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.२३) अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची भेट घेतली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पीएम मोदी म्हणाले- ‘अमेरिकन सरकारने (American government) भारतातून चोरलेल्या १०० हून अधिक कलाकृती परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने मी खूप खूश आहे. मी अमेरिकन सरकारचे आभार मानतो.
यावेळी मोदी पुढे म्हणाले- ‘या मूर्ती चुकीच्या मार्गाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचल्या आहेत, पण आता त्या भारताला परत करण्याचा निर्णय हा दोन्ही देशांमधील भावनिक नात्याचे संबंध स्पष्ट करतो.
भारताच्या हरवलेल्या कलाकृती परत आणण्याचा प्रयत्न
भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केला जात आहे. या मोहिमेचा भाग म्हणून भारत सरकार जगभरातून आपल्या कलाकृती परत आणत आहेत. सरकारने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे- ‘भारताच्या संस्कृती आणि धर्माशी संबंधित अनेक कलाकृती अनेक शतकांपासून परदेशात चोरीला गेल्या किंवा तस्करी करण्यात आल्या. भारताने आता त्याच कलाकृती परत आणण्यासाठी सक्रिय दृष्टिकोन स्वीकारला आहे.
३०७ वस्तू भारतात परत आणल्या
त्यांच्या अनेक परदेश दौऱ्यांदरम्यान, पीएम मोदींनी (PM MODI) या विषयावर जागतिक नेत्यांशी चर्चा केली, त्यानंतर आतापर्यंत २५१ अनमोल कलाकृती भारतात परत आणल्या गेल्या आहेत. त्यापैकी २०१४ पासून २३८ कलाकृती परत आणण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी देखील अमेरिकन अधिकाऱ्यांनी विविध छोट्या तस्करांकडून चोरलेल्या ३०७ भारतीय कलाकृती भारताला परत केल्या आहेत. या कलाकृतींची किंमत सुमारे चार दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अटॉर्नी अल्विन एल. बग्गा ज्युनियर यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये घोषणा केली की ते अंदाजे चार मिलियन अमेरिकन डॉलर किमतीच्या ३०७ भारतीय कलाकृती भारताला परत करत आहेत. यातील बहुतांश आर्ट डीलर सुभाष कपूर यांच्याकडून जप्त करण्यात आले होते. सुभाष कपूर यांनी अफगाणिस्तान, कंबोडिया, भारत, इंडोनेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड आणि इतर देशांतून मालाची तस्करी केली होती.
२०२२ मध्ये, १३ देशांमधून ६८२ वस्तू परत करण्यात आल्या, ज्यांची किंमत ८४ मिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. पुरातन वस्तू तस्करी युनिटच्या स्थापनेपासून सुमारे २२०० कलाकृती २२ देशांमधून परत आणल्या गेल्या आहेत, ज्यांचे मूल्य अंदाजे १९६ मिलियन अमेरिकन डॉलर इतके आहे.