पुणे : एआय अर्थात कृत्रीम बुद्धिमता, चॅट जीपीटीसह जगात दररोज नवे शोध लागत असून आता विद्यापीठांना दर पाच वर्षांनी अभ्यासक्रम बदलावे लागणार आहेत, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या वतीने आयोजित युनि-20 परिषदेच्या समारोपात व्यक्त केले.
सिम्बायोसिस विद्यापीठाच्या वतीने युनि-20 या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन लवळे येथील भव्य विद्यापीठ परिसरात केले होते. यावेळी परिषदेच्या समारोपाला फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शा.ब. मुजुमदार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, डॉ. स्वाती येरवाडकर,जागतिक बँकेच्या प्रतिनिधी डॉ. नीना अर्नोल यांची उपस्थिती होती.
सचिन तेंडुलकरलाही बॅटिंगचे धडे देऊ शकतो…
फडणवीस यांच्या आधी डॉ. मुजुमदार, डॉ माशेलकर आणि इतर वक्त्यांची इंग्रजीतून भाषणे झाली. फडणवीस यांचा नंबर येताच ते म्हणाले, सर्वजण डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील तज्ञ आहेत. परंतु, आम्ही राजकारणी लोक सर्वांना मार्गदर्शन करू शकतो.अगदी सचिन तेंडुलकरला बटिंगचेही धडे देऊ शकतो.
आता चॅटजीपीटी करेल पीएचडी..
डॉ. माशेलकर यांनी अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की,आता दुसरीतला मुलगा देखील शास्त्रज्ञ होऊ शकतो, हे मी कोरोना काळात अनुभवले आहे. तंत्रज्ञानाचा जोरदार प्रसार होत आहे. त्याने सर्वच भिंती तोडल्या आहेत. चॅटजीपीटीद्वारे आता पीएचडी करता येईल. त्यामुळे जगातील विद्यापीठे त्यावर बंदी घालत आहेत.