भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युनो’च्या व्यासपीठावरून सर्व जगाला आवाहन केले की, जगात सुख, शांती नांदायची असेल, तर भारतीय परंपरेतून आलेल्या योगाचा अभ्यास जगभर झाला पाहिजे. या विषयाकडे जगाचे लक्ष केंद्रित व्हावे म्हणून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे त्यांनी आवाहन केले आणि 100 हून देशांत गेल्या 8 वर्षांपासून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जात आहे.
योग साधनेची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून आहे. गेल्या काही वर्षांत योगाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केल्याचा परिणाम असा झाला की, हा प्रत्येकाला करता येण्याजोगा विषय आहे आणि आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगाइतके प्रभावी साधन नाही, ही जाणीव देशभरातल्या लक्षावधी लोकांना झाली. अनेकांनी रामदेव बाबांसारख्या योगगुरूंचे कार्यक्रम पाहून किंवा कोणा मार्गदर्शकाची मदत घेऊन आसने आणि प्राणायाम यांची थोडी माहिती करून घेत नियमित योगसाधना सुरू केली. परदेशातही अनेक योगशिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. लाखोंच्या संख्येने युरोपियन व अमेरिकन नागरिक सध्या या उपचार पद्धतीचा लाभ घेत आहेत. आज बदलत्या काळात धकाधकीच्या जीवनात आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक व्याधींचे प्रमाणही वाढू लागले आहे. शारीरिक आणि मानसिक व्याधींवर योगासने आणि प्राणायाम हा हुकमी उपचार ठरतो आहे. योगासनांमुळे शरीराबरोबरच मानसिक आरोग्यही सुधारत असते, हे अनेकांना ठाऊक नसते पण ती एक अनुभूती आहे. आरोग्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले की, दैनंदिन जीवनात अस्वस्थता निर्माण होते. आरोग्याच्या सततच्या तक्रारींना माणूस वैतागून जातो. त्यामुळेच आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने आणि प्राणायाम नियमित रूपात करणे आवश्यक आहे. जागतिक योग दिन ही योगमार्गाने आयुष्य जगण्यासाठीची सुरुवात करण्याची संधी मानायला हवी.
पूर्वीच्या काळी शिष्य निवडताना आणि शिष्यांना योगविद्येची शिकवण देताना गुरूंकडून अनेक परीक्षा घेतल्या जात असत. सरसकट सर्वांना योगविद्येची शिकवण दिली जात नसे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगप्रसार करताना ही मूलभूत गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे. योगविद्येचे सखोल ज्ञान घेणे आवश्यक आहे. योगविद्येनुसार आचरण करण्याची सुरुवात स्वतःपासून, स्वतःच्या मनापासून झाली पाहिजे. आज आसन व प्राणायाम या दोन पायर्यांसंबंधी काही प्रमाणावर माहिती लोकांना आहे. सामान्यतः योग शिक्षणाचे जे वर्ग चालतात ते या दोन पायर्यांचाच अभ्यास करून घेतात. योगासने हे सांधे, स्नायू व मज्जा या तिन्हींस कार्यक्षम करतात. शरीर सुद़ृढ होते. लवचिक होते. योगासनांमुळे अनेक अंतस्रावी ग्रंथी कार्यक्षम होतात. डायबेटिस, ब्लड प्रेशरसारखे जगापुढील आव्हान बनलेले आजारही योगासनांच्या नियमित अभ्यासाने नियंत्रणात येतात. योगशास्त्र तर असे सांगते की, असलेल्या व्याधी तर योगासनांच्या अभ्यासाने दूर होतातच; पण नियमित योगासने करणारा साधक सहजपणे सर्व व्याधींपासून मुक्त राहू शकतो. सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम मानला जातो. प्रत्यक्षात नमस्काराच्या वेगवेगळ्या स्थिती ही निरनिराळी आसनेच आहेत. प्राणायाम हा श्वासाचा व्यायाम आहे. श्वसनमार्गाची शुद्धी, फुफ्फुसांची ताकद वाढणे, आवाज गोड होणे हे परिणाम लगेच दिसतात; पण मानवी शरीरातील अनेक आंतरिक शक्ती या प्राणायाम केल्याने हळूहळू जागृतही होतात. योगासने आणि प्राणायामामुळे मनावर आलेला ताण दूर होतो. पाश्चिमात्य संशोधकांनाही शरीर आणि मनावरील ताण दूर करण्यात योगासने आणि प्राणायाम अत्यंत उपयुक्त ठरतात, असे आढळून आले आहे.