अकोला, दि.२० : प्रवासी वाहतुकीचा, ऑटोरिक्षा, शहरात वाहतुकीचा परवाना नसतांना देखील शहरात वा जिल्ह्यात अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करा व संबंधितांवर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले.
रस्ते सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे श्रीकांत ढगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, सविता नागवंशी, रुपेश दरोकार, मनपाचे उपअभियंता युसूफ खान, डॉ. निशांत रोकडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील रस्ते वाहतुक सुरळीत व अपघात विरहीत ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना करतांना मार्गदर्शक फलक, सुचना चिन्हे योग्य जागी लावणे आदींबाबत कार्यवाही करण्याची सुचना करण्यात आली. त्यानुसार उपाययोजना करण्यात आल्याचा आढावा घेण्यात आला. शहरात वाहन तळांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरात लोकसंख्येच्या तुलनेत ऑटो रिक्षांच्या संख्येचे प्रमाण लक्षात घेता, विना परवाना चालणाऱ्या ऑटो रिक्षांची तपासणी करुन त्यांचेवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. सहा आसनी, तसेच प्रवासी वाहतुकीचा परवाना नसतांना अनेक वाहने शहरात प्रवासी वाहतूक करत असतात, अशा सर्व वाहनांची तपासणी करुन त्यांचेवर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. अवजड वाहनांच्या शहरातील प्रवेश मनाईच्या वेळांचे काटेकोर पालन व्हावे याही सुचना देण्यात आल्या.