देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयामधील जागांमध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदा ८ हजार १९५ जागा वाढवण्यात आल्या आहेत. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा आता १ लाख ७ हजार ६५८ पर्यंत पोहचल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) ५० महाविद्यालयांना मंजूरी दिल्यानंतर देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ७०२ झाली आहे.
२०१४ पूर्वी देशातील वैद्यकीय जागांची संख्या ५१ हजार ३४८ होती. आता ही संख्या १.०७ लाख झाली आहे. नीट उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी ८ हजार १९५ अतिरिक्त जागांचा लाभ २०२३-२४ च्या शैक्षणिक सत्रा मध्ये मिळेल. ५० नवीन वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रासह आंधप्रदेश, आसाम, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मध्यप्रदेश, नागालॅन्ड, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश तसेच पश्चिम बंगालमध्ये आहेत.