अकोला, दि.8 : अकोला तालुका कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 10 जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, गायवाडा सभागृह, अकोला येथे बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले उत्कृष्ट दर्जाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी महोत्सवाकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शशिकीरण जांभरुणकर यांनी केले.
महोत्सवाचे उद्घाटन आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विधानसभा सदस्य गोवर्धन शर्मा, आ.नितीन देशमुख, आ.हरीश पिंपळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले उत्कृष्ट दर्जाचे, उगवण शक्ती तपासणी केलेले सोयाबीन, तुर, मुग, उडीद आणि खरीप हंगामातील इतर घरगुती बियाणे शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध व्हावे याकरिता बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी बियाणे महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शशिकीरण जांभरुणकर यांनी केले.