अकोला,दि.12 : औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामे प्राध्यान्याने मार्गी लावावे, तसेच जिल्ह्यात प्रस्तावित असलेला मिनी फुड पार्कसंदर्भात प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करुन तातडीने मार्गी लावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत दिले. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजना संदर्भात आज आढावा घेण्यात आला.
जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. यावेळी विधानपरिषद आमदार वसंत खडेलवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, माविमच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे, महाराष्ट्र औद्यागिक महामंडळचे प्रादेशिक अधिकारी दिगांबर पारधी, एमएसईसीबीचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट, जिल्हा नियोजन सहायक अधिकारी कैलाश देशमुख, अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष मालू, निरेश बियाणी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष चंदाणी, तसेच विविध विभागाचे अधिकारी व अकोला उद्योग संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
आमदार वसंत खंडेलवाल यांनी निर्देश दिले की, औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावावे. कामकाजात हयगय करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावावी. वेळप्रसंगी कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी दिले. तसेच जिल्ह्यातील प्रस्तावित मिनी फुड पार्ककरिता प्रशासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वस्त केले.
आढावा बैठकीत जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या उद्योगांना येणाऱ्या विविध समस्या मांडण्यात आल्या. त्यात एमआयडीसी येथील रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, पोलिस चौकी, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करणे, अतिक्रमणामुळे होणारे अपघात, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सुविधा यासारख्या समस्या मांडण्यात आल्या. या समस्या संबंधित विभागाने व अन्य विभागांनी आपापसात समन्वय साधून सोडवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले. उद्योजकांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करुन तातडीने मार्गी लावावे,असे निर्देश संबंधितांना दिले.