अकोला,दि.10 :- बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे भेट देऊन उपचार घेणाऱ्या जखमींची आपुलकिने चौकशी केली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी आले. त्यांचे समवेत विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. हरिष पिंपळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये आदी उपस्थित होते. या सर्व जखमींची श्री. महाजन यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांना दिल्या जात असलेल्या उपचार सुविधांची माहिती घेतली.
अकोला येथील रुग्णालय व्यवस्थापन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे कामकाजात सुधारणा होण्यासाठी तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आपण लवकरच मंत्रालयात एक बैठक घेणार आहोत. त्यात हे प्रश्न सोडविण्याचा व जिल्ह्यातील आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करण्याचा प्रयत्न करु. आरोग्य सेवांसाठी लागणारी वर्ग 3 व 4 ची पदे भरण्यासाठी दोन महिना कालावधीत प्रक्रिया पूर्ण करु असेही त्यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
मृतांच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल या शिवाय जखमींना मदत व उपचार सुविधा शासनातर्फे पुरविण्यात येईल,असेही श्री. महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.