आगामी दोन दिवस म्हणजे शनिवार व रविवारी महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा या राज्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला असून तेथे वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किमी राहणार असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरासह मध्य प्रदेश ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा व वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. हा पट्टा विदर्भातून जात असल्याने तेथे वाऱ्याचा वेग जास्त आहे. मात्र याचा परिणाम संपूर्ण राज्यावर होणार असून आगामी पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. त्यात 8 व 9 एप्रील म्हणजे शनिवार व रविवारी राज्यात सावधानतेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
या भागात दोन दिवस पावसाचा जोर..
विदर्भातील अमरावती, वर्धा, अकोला या भागासह कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर,उस्मानाबाद,नाशिक या जिल्ह्यात वादळी वार्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. शुक्रवारी या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. अकोला शहरात गारपीट झाली.
कमाल तापमानात 3ते 4 अंशांनी घट होणार
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहिती नुसार संपूर्ण राज्यात 8 व 9 रोजी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊसाचा अंदाज आहे. त्यामुळे 40 अंशावर गेलेले राज्याचे तापमान कमी होऊन सरासरी 36 अंशावर येईल. पावसाचा जोर 9 एप्रिल नंतर कमी होईल. मात्र 13 एप्रिलपर्यंत राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.