अकोला दि.5 :- राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार आज आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण करण्यात आले. जिल्ह्यात 3 लाख 31 हजार 357 लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून शिधा वितरीत होईल.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘आनंदाच्या शिधा’ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, पुरवठा अधिकारी प्रतिक्षा देवणकर, विजय अग्रवाल, विठ्ठल सरप व लाभार्थी उपस्थित होते.
शिधा वितरण प्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकऱ्यांना सण उत्सव साजरे करता यावे याकरीता आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयामुळे गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांचा आनंद व्दिगुणीत झाला असून निश्चितच त्यांना लाभ होणार आहे.आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शिधा वाटपापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता पुरवठा विभागाने घ्यावी, अशी सूचना आ. सावरकर यांनी केली.
असा असेल “आनंदाचा शिधा”
जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलो प्रमाणे रवा, चणाडाळ, साखर व पामतेल हा शिधा देण्यात येणार आहे. हा “आनंदाचा शिधा” गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने 100 रुपये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरीत होणार आहे.
जिल्ह्यातील 3 लाख 31 हजार 357 लाभार्थ्यांना मिळेल ‘आनंदाचा शिधा’
अंत्योदय अन्न योजना, शेतकरी व प्राधान्य कुटूंब योजनेतील 3 लाख 31 हजार 357 लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत होणार आहे. तालुकानिहाय शिधा वाटप याप्रमाणे :
अकोला तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 6637, प्राधान्य कुटूंबातील 49551, शेतकरी 6872 असे एकूण 63060 लाभार्थी. अकोला शहरात अंत्योदय अन्न योजनातील 1416, प्राधान्य कुटूंबातील 38658, शेतकरी 717 असे एकूण 40791 लाभार्थी. अकोट तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 6516, प्राधान्य कुटूंबातील 27813, शेतकरी 10066 असे एकूण 44395 लाभार्थी. बाळापूर तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 5433, प्राधान्य कुटूंबातील 32071, शेतकरी 1968 असे एकूण 39492 लाभार्थी. बार्शीटाकळी तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 6973, प्राधान्य कुटूंबातील 26253, शेतकरी 2428 असे एकूण 35654 लाभार्थी. मुर्तिजापूर तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 5987, प्राधान्य कुटूंबातील 27714, शेतकरी 7478 असे एकूण 41179 लाभार्थी. पातूर तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 4964, प्राधान्य कुटूंबातील 22083, शेतकरी 2289 असे एकूण 29336 लाभार्थी. तेल्हारा तालुक्यात अंत्योदय अन्न योजनातील 5990, प्राधान्य कुटूंबातील 24980, शेतकरी 6480 असे एकूण 37450 लाभार्थी. अंत्योदय अन्न योजनातील 43 हजार 936, प्राधान्य कुटूंबातील 2 लाख 49 हजार 123, शेतकरी शिधापत्रिकाधारक 38 हजार 298 असे एकूण 3 लाख 31 हजार 357 लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप होणार आहे.
1061 केंद्रावर वितरण
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत 1 हजार 061 स्वस्त धान्य दुकानाव्दारे आनंदाचा शिधा वितरण होणार आहे. त्यात अकोला तालुक्यातील 124, अकोला ग्रामीण 174, बार्शीटाकळी 127, मुर्तिजापूर 163, बाळापूर 114, पातूर 94, तेल्हारा 99 व अकोट 166 केंद्रावर वितरीत होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी दिली.