अकोला,दि.1 :- सामाजिक न्याय विभागाव्दारे दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी‘ सामाजिक न्याय पर्व’ उपक्रम राबविण्यात येत आहे. हा अभियान यशस्वी करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. याकरिता सामाजिक न्याय व सर्व विभागाने समन्वय साधून योजनाचा लाभ तळागावातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या सामाजिक न्याय भवन येथे ‘सामाजिक न्याय पर्वाचे’ उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे सभापती श्रीमती आम्रपाली खंडारे, समाजकल्याण कार्यालयाचे विशेष अधिकारी प्रदिप सुसतकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले की, एप्रिल महिन्यात राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तीं यांची जयंती असून या महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळयासमोर ठेऊन तळागाळातील वंचित, दलित मागसवर्गीयापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवा. याकरिता महिन्याभराचा कृती आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी. समतादूत यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागात विविध उपक्रम राबवावी. यामध्ये मार्गदर्शन कार्यशाळा, शिबीर, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, लाभार्थ्यांना साहित्य वाटप, आश्रामशाळा व वसतीगृहात संविधान वाचन, पथनाट्य व लघुनाट्यद्वारे योजनांची माहिती व प्रबोधनाचे कार्य करावे. या सामाजिक समता पर्वामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ होईल याकरिता नियोजन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
सभापती श्रीमती आम्रपाली खंडारे संबोधनात म्हणाले की, ग्रामीण भागातील वंचिताना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी समाजकल्याण विभागाने विशेष प्रयत्न करावे. शासनाच्या योजनाचा लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांचा शोध घेवून प्रत्यक्ष लाभ द्यावा. सामाजिक न्याय विभागाव्दारे राबविल्या जाणाऱ्या योजनापासून कोणीही वंचित राहणार नाही दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय पर्व यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष समाजकल्याण अधिकारी प्रदिप सुसतकर यांनी केले. सुत्रसंचालन वैशाली गवई यांनी तर आभार प्रदर्शन उज्वल भटकर यांनी केले.
सामाजिक न्याय पर्वात राबविण्यात येणारे उपक्रम
सामाजिक न्याय पर्व कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे, जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहीमचे आयोजन करणे, राज्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय यांच्या वतीने शिक्षण विभागाशी समन्वय साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत जात प्रमाणपत्र देणे. विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, महाविद्यालय, आश्रम शाळा, निवासी शाळा व शासकीय वसतीगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर इतरही महापुरुषांच्या विचारावर आधारित वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करणे. तालुका व जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे लाभार्थी यांना प्रतिनिधिक स्तरावर साहित्य वाटप करणे व योजनांची माहिती देणे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजन करणे. जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती व नागरिकांचे मेळावे घेणे. दिव्यांग बांधवांना व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध होण्याचा अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे.