महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने वर्णनात्मक अभ्यासक्रम 2025 पासून लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय ठराविक परीक्षांसाठीच आहे. तर अभियांत्रिकी, कृषी व वनसेवा परीक्षांसाठी मात्र वर्णनात्मक अभ्यासक्रम 2023 पासून लागु करण्यात येणार आहे. त्यामुळे आयोगाने घेतलेला निर्णय सर्वच परीक्षांसाठी लागु करावा, अशी मागणी युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षार्थींनी आंदोलन करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लागू केलेला बदलेला अभ्यासक्रम 2025 पासून लागू व्हावा ही मागणी मान्य करून घेतली. स्पर्धा परीक्षार्थींची ही मागणी रास्त होती, यात तिळमात्र शंका नाही. पण ही मागणी मान्य करून त्यावर निर्णय घेतांना मात्र पुन्हा एकदा अर्धवट अभ्यासावर निर्णय घेण्यात आला. याचे परिणाम अनेक स्पर्धा परीक्षार्थींना भोगावे लागणार आहेत.
यादव म्हणाले की, अभियांत्रिकी, कृषी, वनसेवा यांचा अभ्यासक्रम सर्वात उशिरा म्हणजेच 24 जानेवारी 2023 ते 1 फेब्रुवारी 2023 दरम्यान जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे अचानकपणे झालेल्या या बदलांना आत्मसात करून मुख्य परीक्षेची तयारी करणार्या स्पर्धा परीक्षार्थींना या परीक्षेला पूर्ण क्षमतेने सामोरे जाण्यासाठी पुरेसा वेळ हवा आहे. ज्या समस्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षार्थींना येत आहेत. त्याच समस्यांना अभियांत्रिकी किंवा कृषी व वनसेवेचा अभ्यास करणार्या उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे.
तर तीव्र आंदोलन करू…
स्पर्धा परीक्षार्थींची मागणी तातडीने मान्य करून सर्व परीक्षांसाठी अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा. अन्यथा या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि तरीही सकारात्मक निर्णय झाला नाही तर याबाबत न्यायालयीन लढाई लढण्याची आमची तयारी आहे. याची राज्यसरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. असे देखील यादव यांनी स्पष्ट केले आहे.