अकोला,दि. 8 :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतगत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा परस्कार, राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी सोमवार दि. 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र इच्छुक क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू यांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांनी केले.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्याकडून दि. 30 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. परंतु विविध क्रीडा संघटना व खेळाडूंच्या मागणीनुसार पुरस्कारासाठी दि. 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्यामधील लिंकवर पहावी. तरी जिल्ह्यातील इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांनी केले.