अकोला दि.25 :- अमरावती विभाग पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात मतदान यंत्रणेतील 430 अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये 320 मतदान अधिकारी व कर्मचारी, 70 मायक्रो ऑब्झर्व्हर व 40 इतर अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित होते, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी दि. 30 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा तयारी करीत असून मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी 1,2,3 यांचे दुसरे प्रशिक्षण आज घेण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रभारी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, कृषि विभागाचे उपसंचालक डॉ.कांतप्पा खोत, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणात मतदान केंद्र, मतदान केंद्रावर मतदारांसाठी उभारावयाच्या सोई सुविधा, मतदानाची गोपनीयता, मतपेट्या इ. बाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान अकोला जिल्ह्यात 50 हजार 609 पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी जिल्ह्यात 61 मतदान केंद्र असून त्यापैकी 32 केंद्र हे अकोला शहरात आहेत.