अकोला दि. 20 :- अमरावती विभाग पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात मतदान यंत्रणेतील ३२० अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. दरम्यान, या प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या १७ कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी दि.३० रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा तयारी करीत असून मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी १,२,३ यांचे प्रशिक्षण आज घेण्यात आले. प्रशिक्षण देण्यासाठी सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के हे तज्ज्ञ व्यक्ति म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणात मतदान केंद्र, मतदान केंद्रावर मतदारांसाठी उभारावयाच्या सोई सुविधा, मतदानाची गोपनीयता, मतपेट्या इ. बाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान अकोला जिल्ह्यात ५० हजार ६०९ पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी जिल्ह्यात ६१ मतदान केंद्र असून त्यापैकी ३२ केंद्र हे अकोला शहरात आहेत.
या प्रशिक्षणाला १७ कर्मचारी अनुपस्थित होते. या कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३४ नुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.