औरंगाबाद : राज्यभर गाजलेल्या ३०-३० घोटाळ्यात मोठे अपडेट समोर आले आहे. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यावर या प्रकरणात अंमलबजावणी ईडीने एन्ट्री केली आहे. ईडीने या प्रकरणाची कागदपत्रे मागविली असून पोलिसांनी ती पाठविली आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मातब्बरांची नावे गुंतवणूकदारांच्या यादीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काय आहे ३०-३० घोटाळा?
वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी शासनाने जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा मावेजा दिला होता. याच मावेजावर मास्टरमाइंड संतोष राठोडने डल्ला मारला. शेतकऱ्यांना २५ ते ३० टक्के व्याजाचे आमिष दाखवून, त्याने कोट्यवधी रुपये उकळले. काही दिवस परतावा दिला, मात्र नंतर परतावा बंद केला. त्यामुळे १६ नोव्हेंबरला २०२१ ला बिडकीन ठाण्यात ज्योती ढोबळे या महिलेने पहिला गुन्हा दाखल केला होता. पुढे रात्रीतून त्यांचे दहा लाख रुपये मिळाल्यावर हा गुन्हा मागे घेण्यात आला होता. त्यात राठोडला अटकपूर्व जामीनही मिळाला होता, परंतु २१ जानेवारीला दौलत जगन्नाथ राठोड (रा. निलजगाव फाटा, ता. पैठण) यांनी तक्रार दिल्याने संतोष राठोडसह पंकज चव्हाण आणि कृष्णा राठोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि लगेचच संतोष राठोडला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कोठडीत आहे.
मुख्य आरोपी संतोष राठोडच्या डायरीतील १३१ गुंतवणूकदारांची नावे समोर
ही आहेत राजकीय नेत्यांसह गुंतवणूकदारांची नावे
आरोपी संतोष राठोडच्या घरात पोलिसांना तीन वेगवेगळ्या डायऱ्या आढळल्या होत्या. त्यांत वेगवेगळ्या गुंतवणूकदारांची नावे लिहिलेली होती. ती नावे सध्या समोर आली आहेत. यांत अंबादास दानवे, जि.प. सदस्य विजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य कृष्णा चव्हाण, संतोष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाऊसाहेब तरमळे, बिडकीनचे माजी सरपंच मनोज पेरे, डीवायएसपी प्रदीप पवार, नंदिनी हॉटेल मालक शिवसेना पदाधिकारी राजेंद्र प्रल्हाद राठोड, राजेश जंगले, पेट्रोल पंपचालक शेखर म्हस्के, डॉ. अविनाश चव्हाण, सिंघानिया बिल्डर्सचे संतोष चव्हाण, एपीआय नामदेव चव्हाण, शिक्षक राहुल मांडे, कन्नडचे नगरसेवक रवी मधू राठोड, सोनपेठचे नगराध्यक्ष चंद्रकांत नामदेवराव राठोड, पेट्रोल पंप मालक प्रल्हाद मेहरबान राठोड, शासकीय ठेकेदार पप्पू पवार, बोकूड जळगावच्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विजय रामसिंग चव्हाण, शिक्षक मनोज भीमसिंग चव्हाण, हॉटेल मराठा पॅलेसचे संतोष लालासिंग चव्हाण, पृथ्वीराज पवार, बाबूराव नालमवार, लॉटरी दुकानचालक राजू राठोड, कडा ऑफिस येथील अभियंता अविनाश शंकर चव्हाण, प्रा. रवींद्र राठोड आदींसह १३१ गुंतवणूकदारांच्या नावांची यादी व्हायरल झाली आहे.
सहा आरोपींविरुद्ध ५०० पानांचे चार्जशीट दाखल
संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड (मुंडवाडी तांडा, ता. कन्नड), कृष्ण एकनाथ राठोड (रा. बंगला तांडा, ता. पैठण), पंकज शे- षराव चव्हाण (रा. बोकुडजळगाव तांडा, ता. पैठण), सूर्यकांत नामदेवराव राठोड (रा. सोनपेठ, परभणी), शकील लियाकत (रा. शंकरनगर, नाशिक), सुशील यादव पटेल (रा. कलकत्ता) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध तत्कालीन तपास अधिकारी शीलवंत नांदेडकर यांनी ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. ५०० कोटींचा घोटाळा असल्याचे चर्चिले जात होते. मात्र, प्रत्यक्षात ६८ कोटींचे व्यवहार समोर आले होते.