अकोला दि. 13 :- शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व शासकीय, निम्म कार्यालय, महामंडळ, शैक्षणिक संस्था व शाळा, महाविद्यालय स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावयाचा आहे. त्याअनुषंगाने शैक्षणिक संस्था, शाळा व महाविद्यालयांनी पुढाकार घेवून मराठी भाषा संवर्धनाकरीता दि. 14 ते 28 जानेवारी दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यासंदर्भात आज सर्व शैक्षणिक संस्था, शाळा व महाविद्यालयांचा आढावा बैठक घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, तहसिलदार शिल्पा बोबडे, शैक्षणिक संस्था, शाळा व महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा तसेच त्यांचे संवर्धन व्हावा, याकरीता मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा
(दि.14 ते 28जानेवारी) कालावधीत शासकीय व निम्म शासकीय कार्यालय, खाजगी व व्यापारी बँकांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच शाळा व महाविद्यालयांनी मराठी भाषेसंबधित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांचा सहभागाकरीता प्रोत्साहित करावे. याकरीता नाट्य, नृत्य, कवि संमेलन, वकृत्व, ग्रंथ प्रदर्शनी, मराठी समूह गीत, निबंध स्पर्धा, जनजागृतीपर अशा विविध कार्यक्रमाव्दारे मराठी भाषा संवर्धनाकरीता पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. तसेच विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरीता शाळा महाविद्यालयांनी प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळा कार्यक्रमांत देशभक्ती व मराठी भाषा संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कालावधीतील नियोजीत कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमानुसार सर्व संबधित विभागाने मराठी भाषा संवर्धनासंदर्भात कार्यवाही करुन पंधरवाडा यशस्वीपणे राबवावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.