अकोला दि. 13 :- अल्पसंख्याकांनी आपल्या अधिकार व हक्काबाबत जागृत राहण्यासाठी शिक्षीत होणे महत्वाचे आहे. सोबतच त्यांचे अंमल करणेही तेवढेच महत्वाचे आहे. केवळ स्वत:च्या हितासाठी न जगता इतरासाठी जगणे हाच खरा मानव धर्म आहे, यातूनच आपला विकास साध्य होतो, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमात सांगितले. यावेळी स्पर्धेत विजेत्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ निमित्त शाळा व विद्यालय स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजय झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार शिल्पा बोबडे, मुक्ती मो. अशफाक कासमी, धर्मगुरु बौद्ध समाजाचे धम्मचारी कृपावीर, रेड क्रॉस सोसायटीचे प्रभाजीत बछेरे, कार्मल स्कूलचे प्राचार्य फादर मेथुस, जैन मंदिरचे अध्यक्ष मयुर शहा, शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाले की, स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवण्यापेक्षा सहभागी होणे महत्वाचे आहे. अपयशातूनच यशाचा मार्ग सापडतो. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत घेतलेला सहभाग हे कौतूकास्पद असून अशा स्पर्धेच्या माध्यमातून सर्वागिण विकास साध्य होण्यास मदत होते. अल्पसंख्याक समुदयासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनाची माहिती सर्वांपर्यत पोहोचली पाहिजे, याकरीता सर्वानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशिर हक्क व अधिकाराची जाणीव व्हावी याकरीता प्रशासन व महाराष्ट्र अल्पसंख्याक फोरमच्या वतीने शाळा व विद्यालय स्तरावर वक्तृत्व, भिंतीपत्र व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अशा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव होवून त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होते. ध्येय शिवाय जीवन सफल होवू शकत नाही. याकरीता विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी सुक्ष्म नियोजन केले पाहिजे. सर्वागिण विकास साध्य होण्यासाठी परिश्रम हाच एकमात्र मार्ग आहे. विद्यार्थांनी केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता त्यांचा अंमल आपला जीवनात करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले. शासन व प्रशासन अल्पसंख्याकांच्या सर्वागिण विकासासाठी कार्यरत आहे. याकरीता प्रशिक्षण, विविध स्पर्धा, मार्गदर्शन कार्यशाळा अशा विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र अल्पसंख्यांक फोरमचे सहसचिव मोहम्मद रफीक यांनी अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त झालेल्या स्पर्धेची माहिती दिली. तसेच अल्पसंख्याकांकरीता शासनाव्दारे राबवित असलेल्या विविध योजनाची माहिती प्रास्ताविकेतून दिली. तसेच कार्यक्रमा दरम्यान वकृत्व स्पर्धेत विजय झालेल्या विद्यार्थ्यांनी अल्पसंख्याकांचे अधिकारी व हक्काविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक महाराष्ट्र अल्पसंख्यांक फोरमचे जिल्हा निरीक्षक मिर्जा खालिद यांनी तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र अल्पसंख्यांक फोरमचे जिल्हा अध्यक्ष डॉ. जुबेर नदीम यांनी केले.
शाळा व विद्यालयस्तरावर विजय झालेले स्पर्धक
वकृत्व स्पर्धा – गट अ : पहिला क्रमांक-अनम शफिया सैय्यद अनसार, दिव्तीय- रूकैय्या सहर ऐजाज खान, तृतीय क्रमांक आशीया समन तन्वीर खान, गुप बी : पहिला क्रमांक-रहिला अफरिन सैय्यद रहीम, व्दितीय- अनय सानिया शेख रुफीक, तृतीय सालेहा अबरीन मो. अकील व जोहा समीन सय्यद अक्वीन अली संयुक्त.
भिंतीपत्र स्पर्धा – गट अ : पहिला क्रमांक-मंतशा उरूज फातेमा अल्ताफ, दिव्तीय- आशाना अस्तफा अब्दुल समद, तृतीय- महेक फीरदोस रहमान खान, ग्रुप बी : पहिला क्रमांक- लीसा यशलीन नाशीर खान, व्दितीय- जुबीया सना साजिद खान, तृतीय- आकीब खान अरिप खान
निबंध स्पर्धा : गट अ : पहिला क्रमांक- सैयाब आदिल खालीद मोहासीन, व्दितीय- अलीमुस सैदिया शेख कलीम, तृतीय- अशमीरा फातेमा परवेज खान व मासेरा फातीमा ख्वाजा सैफुदीन, गुप बी : पहिला क्रमांक-आयेशा तदासून नवाज, व्दितीय- सादिया अनम इब्राहिम पटेल, तृतीय- मानशी विजय मानकर व जेव्हेरीया खानम अफरोज खान संयुक्त.